Processed product

संघर्षातून समृद्धीकडे

श्री. तात्यासाहेब फडतरे

समृद्धी ऍग्रो ग्रुप, राहुरी.


इंदापूर तालुक्यातील वडापुरी हे आमचं गाव. नवनाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांची कथा ही वडापुरीतलीच. आमचं कुटुंब तसं धार्मिक- वारकरी संप्रदायातील.वडील दर वर्षी वारीला जायचे, विठ्ठलाचे परम भक्त. शेतीसोबतच आयुर्वेदिक औषध उपचार करायचे.त्यांच्या हाताला गुण चांगला यायचा. नागीण झाल्यावर तर त्यांच्या औषधांशिवाय इलाजच नसायचा, म्हणून लांबून लांबून लोक यायचे.  पण आर्थिक परिस्थिती हालाखीचीच. आम्ही सर्व आठ भावंड होतो म्हणजे सहा बहिणी आणि आम्ही दोन भाऊ. एवढं मोठं खटलं म्हणल्यावर सगळ्याचा  मेळ बसणं अवघड. मी शाळा बिनचप्पलची केली. पहिल्यांदा चप्पल मिळाली आठवीत गेल्यावर…दहावीला मात्र शाळेचं नावच काढलं, मला दहावीला पंचाहत्तर टक्के मार्क्स पडले. आत्तापर्यंत शाळेत कधीच कोणालाही एवढे मार्क मिळाले नव्हते. माझ्यापेक्षाही माझ्या शिक्षकांनाच खूप आनंद झाला.माझ्या डोक्यात वेगळेच चक्र चालू झाले होते, आपण आयटीआय करून लवकरात लवकर नोकरीला लागणे महत्वाचे. म्हणजे हाताची आणि तोंडाची गाठभेट तरी होत जाईल असे मला वाटले. पण मला मिळालेले मार्क्स पाहून वडिलांना वाटले की मी डॉक्टर व्हावं म्हणून त्यांनी मला अकरावी-बारावीसाठी अकलूजला शिकायला ठेवलं. घरच्या परिस्थितीमुळे दहावी बारावीला क्लास लावावे लागतात हे आमच्या गावीही नव्हते. सायन्सला प्रवेश घेतल्यामुळे प्रचंड अभ्यास केला. कारण आमची इंग्रजी गावरान होती, आठवीपासून सुरू झालेली होती. ह्या मेहनत्तीच फळ बारावीला ७९टक्के मार्क्स पडले. वडिलांचं स्वप्न …मी डॉक्टर व्हावं, अगदी बेळगावच्या आयुर्वेदीक कॉलेजला माझा नंबर ही लागला, कारण मी विद्यापीठाच्या यादीत तेव्हा १९९४ साली अकरावा होतो. नंबर लागला तरी तिथली फीस होती …बावीस हजार… कुठून आणणार? म्हणून मला वाटायचं आय टी आय करावं आणि नोकरीला लागावं… पैसे कमवावे बस्स…पण एक चुलते शेतकी अधिकारी होते,  त्यांनी ऍग्री चा फॉर्म भरायला लावला आणि पुण्याच्या अग्रीकल्चर कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. फी होती फक्त साडेतीन हजार रुपये आणि मला मेरिट स्कॉलरशिप होती पाच हजार आठशे रुपये. त्यामुळे घरून कधीच पैसे आणावे लागले नाहीत. मेसमध्ये जेवणासाठी सहाशे रुपये लागायचे, म्हणून मी सर्व मुलांना जेवण वाढण्याचं काम करून शेवटी जेवायचो त्यामुळे मेस चं बिल ही वाचलं. हे काम मी दोन वर्ष केलं. तिसऱ्या वर्षात असताना अलका चौकातील तुषार लॉजवर रात्रीची ड्युटी सुरू केली. आमचे शिक्षक खूप छान होते. तेव्हाचे आमचे विद्यार्थी कल्याण अधिकारी असणारे यादवसर खूपच प्रेमळ आणि संवेदनशील होते. माझी धडपड पाहून त्यांनी लॉजच्या नोकरीसाठी केलेल्या शिफारशीमुळे मला चौदाशे रुपये पगार मिळाला. रात्रपाळीमुळे दिवसा खूप झोप यायची , पण सर्व शिक्षकांनी खूप समजून घेतले.दरम्यान १९९८ साली वडिलांचे कॅन्सर मुळे निधन झाले. ज्या विट्ठलावर अपार श्रद्धा होती त्यानेही त्यांना वाचवलं नाही या विचाराने माझा ईश्वरावरचा विश्वासच उडाला. पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आणि लगेच एक पार्टनर घेऊन नर्सरी चालू केली, लँड स्केपिंगची कामं घ्यायला लागलो. खूप पैसे कमावले पण पार्टनरने फसवल्याने आमचा तो पहिलावहिला धंदा बुडाला. 

 त्याच दरम्यान दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शंकरराव मगर हे गावी जवळच राहायला होते , त्यांनी सरळगाव येथे नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयात कृषी अधिकारी म्हणून संधी दिली. तिथे काम करत असताना माझ्यातील चुणूक पाहून त्यांच्या भाचीच स्थळ माझ्यासाठी सुचवलं…सुचवलं म्हणण्यापेक्षा फायनलच केलं. मला मात्र खूप काळजी वाटायची एवढी श्रीमंत घरातील मुलगी आपल्याकडे कशी ऍडजस्ट होईल? पण त्यांनी गळच घातल्याने मला नकार देता आला नाही आणि सुस्वभावी, होम सायन्स पदवीधर असलेली सरोज माझ्या आयुष्यात अर्धांगिनी बनून आली. सरोज अगदी लक्ष्मीच्या पावलांनीच घरात आली. आमचं घर म्हणजे एकदम साधं म्हणजे तेव्हा आमच्या घरात आंघोळीसाठी बाथरूम ही नव्हतं… केवढा त्याग आणि कष्ट करावे लागले तिला. पण विनातक्रार , हसत हसत संसाराचा व्याप उचलला आणि आजही उचलत आहे.

संसाराचा व्याप वाढल्याने महाविद्यालयाच्या नोकरीच्या पगारात पुरेनासे झाले. म्हणून सरळगाव सोडले आणि थेट हैद्राबाद येथे ई टीव्हीच्या अन्नदाता या नियतकालिकात उपसंपादक म्हणून रूजू झालो. २००६ ते २००८ ह्या दोन वर्षात हैद्राबाद मधली भाषा आणि खाद्य संस्कृती यांचा मेळ काही बसेना. खूप दूर आल्यासारखी भावना सतत व्हायची. म्हणून तिथेही राजीनामा देऊन पुण्यात एक कृषीविषयक नियतकालिकात उपसंपादक म्हणून काम सुरू केले. तसेच बचत गटांना प्रॉडक्ट बनवण्याचे आणि मार्केटिंगचे प्रशिक्षण देण्याचे काम होते. ह्या कामात खूप ओळखी झाल्या. सात राज्यांचा जवळून अभ्यास करता आला. पण सातत्याने कशाची तरी उणीव भासायची . नोकरीला साधारण बारा वर्षे झाली होती, पण स्वतःचं असं काहीतरी आपणही सुरू करावं असं सतत वाटायचं. वरिष्ठांकडून मिळणारी वर्तणूक स्वाभिमानी स्वभावाला सतत बोचायची.

 सन २००६ मध्ये संधी चालून आली. कृषी विभागाने भरडधान्य विकास कार्यक्रमाची योजना सुरू केली होती. ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्यांवर भरड प्रक्रिया करून विविध उत्पादनं तयार करण्याची कल्पना अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून पुढे आली आणि हे क्षेत्र नाविन्यपूर्ण असूनही यात व्यावसायिक संधी भरपूर निर्माण करता येतील अशी आशा पल्लवित झाली. विचारांती मी पूर्णपणें आणि पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.  वडापुरी येथे दहा जणांचा बचतगट केला. आमचे मामा, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगर साहेब हे बचत गटाचे अध्यक्ष झाले आणि मी सचिव.पण तो पर्यंत योजनेचे टार्गेट पूर्ण झाले होते. माझा नंबर ५९वा होता आणि टार्गेट होते ५० चे. कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळखी मुळे आणि आपल्या वरील प्रेमामुळे सुनील बोरकरांनी प्रयत्न करून माझ्यासह नऊ जनांचाही या योजनेत समावेश केला आणि माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला.

आमच्या कष्टाची पराकाष्ठा सुरू झाली. अर्धांगिनी सौ. सरोज होम सायन्स पदवीधर असल्याने सर्व उत्पादनाचा प्रयोग आधी  घरात होत असे. त्यात यश आल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते करत असू. २०१२ मध्ये पुण्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनात आमच्या उत्पादनांना विक्रीसाठी पहिले व्यासपीठ  मिळाले. ज्वारीच्या चकल्या, शंकरपाळ्या, इडली हे पदार्थ सरोजनेच केले. पण नोकरीचाच अनुभव गाठीशी असल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचताच येईना. ग्राहक स्टॉल जवळ आले की संकोचून मान खाली घालून आम्ही दोघेही उभे असायचो. ही बाब कृषी अधिकारी अर्जुन फुले यांच्या लक्षात आली, त्यांनी पहिला धडा शिकवला. ग्राहकांनी काही घेवो किंवा न घेवो ,   त्यांना आपले प्रॉडक्ट देऊन धीटपणे संवाद साधायचा. झाले…मनाने ही हिय्या केला आणि पहिल्याच दिवशी नऊशे रुपयांची तर चार दिवसात साडे चार हजार रुपयांची विक्री झाली. 

त्यानंतर आत्मविश्वास दुणावला आणि ग्राहकांचे जाळे प्रदर्शनाच्या माध्यमातून खूपच वाढले. त्यातूनच पुण्यातील एका महिलेने पन्नास जणांसाठी ज्वारीच्या इडलीची ऑर्डर दिली. ती सर्व इडली आम्ही घरी बनवून पोहोच केली आणि होम डिलिव्हरी चा टप्पा सुरु झाला. त्याच दरम्यान कोकणातील एक इडलीची ऑर्डर आली आणि आता कोकणात कशी द्यावी हा प्रश्न पडला. मग मी त्यांना म्हणालो की मी पीठ तयार करून देतो , तुम्ही ते भिजवून इडली तयार करा. अशा तऱ्हेने इडली मिक्स चा जन्म झाला. ग्राहकांची नाडी ओळखून प्रक्रियेचे पुढचे दालन खुले झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉ. चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाने ज्वारी बाजरी आणि नाचणी यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले.

आमच्या उद्योगाचे स्वरूप २०१३ मध्ये विस्तारले. देवळाली प्रवरा येथे ही ‘समृद्धी ऍग्रो ग्रुप’ या नावाने धान्य ग्रेडिंगचे युनिट सुरू केले. खरंतर ज्वारी , बाजरीच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळणे सोपे नव्हते. पण उत्पादनांच्या विक्री बरोबरच नाचणीतील लोहामुळे मुलींमधील रक्तक्षय कमी होण्यास मदत होते, ज्वारी आणि बाजरीतील कर्करोग , मधुमेह प्रतिबंधात्मक गुणधर्म मी ग्राहकांना  पटवून देत होतो. आरोग्यदायी अन्नाची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यास सुरुवात केली. 

आमच्या कामाची वाखाणणीही समाजात होण्यास लगेचच सुरुवात झाली. २०१३ मध्येच आम्हाला सहयाद्री वाहिनीचा नवउद्योजकांचा पुरस्कार मिळाला आणि प्रथमच दूरचित्रवाणी वर झळकलो. पैशांपेक्षा प्रसिद्धी खूप लवकर मिळाली. २०१५ मध्ये आमच्या उत्पादनांचा संपूर्ण भारतातून  दुसरा क्रमांक आला. २०१९ मध्ये ऍग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार मिळाले. आमची उत्पादने जसे ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी , बाजरीची पिठं यांची गुणवत्ता सर्व निकषांच्या कसोटीवर उतरली आणि त्यांना भारताबाहेरही जसं की अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी ही बाजारपेठ मिळवली आहे. अजूनही निर्यातीचा परवाना नसल्याने संघर्ष सुरुच आहे. लवकरच तो परवाना ही मिळेल. आता मिश्रधान्यांचे कुरकुरे ही सुरुकेले आहेत. 

मी आणि सरोज आमचा दिवस भल्या पहाटे सुरू होऊन रात्री उशिरा मावळतो. सरोजचे कष्टच मला खरंतर समृद्धीकडे घेऊन आले. सरोजबरोबरच आमच्या वेलीवर आलेली दोन फुलं , माझ्या दोन्ही कन्या ह्यांनी ही त्यांचं बालपण आमच्या फरफटीत घालवले. चिकाटी आणि जोखीम पत्करण्याची तयारी, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्रांच्या शुभेच्छा असल्याने मानहानी, संयमाची परीक्षा पाहणाऱ्या कटू प्रसंगातही एकमेकांना सांभाळत आमच्या बरोबरच ज्वारीलाही समृद्धीचे दिवस आणण्यात आम्ही यशस्वी झालो. शून्यातून उभा केलेला हा प्रकल्प आता दिमाखाने आपली ध्वज पताका परदेशातही मिरवत आहे.